भारतातील नवीन महिला उद्योजिकांच्या समोर अनेक अडथळे असतात. सर्वात पहिला अडथळा म्हणजे कुटुंब आणि समाजाकडून अपेक्षित स्वीकृती मिळणे. हाच अडथळा व्यवसायात देखील उद्योगाची सुरुवात होत असताना जाणवतो. अनेकदा महिला व पुरुषांमधील विषमता ह्याला कारणीभूत ठरते. ह्याखेरीज व्यवसाय वाढवायला महिला उद्योजिकांना इतरही अनेक समस्यांवर मात करावी लागते, जसे…
1. समाजाकडून आधार नसतो: वर्तमान काळात नारी शक्तीला प्रोत्साहन मिळत असले तरी पारंपारिक प्रथांमुळे महिलांना स्वतंत्र निर्णय घेण्याचा हक्क नसतो.
2. आर्थिक मदतीसाठी पर्याय नसणे: आर्थिक गरजांसाठी महिला आपल्या कुटुंबावर अवलंबून असतात आणि बाहेरून आर्थिक मदत घ्यायची झाली तर बँक हा एकमेव पर्याय असतो. बँका महिलांना कर्ज देण्याचे टाळतात, कारण साधारणपणे तारण ठेवायला महिलांकडे स्वतःच्या नावाची संपत्ती नसते. अशा वेळी व्यवसायात तोटा झाला अथवा व्यवसाय अयशस्वी झाला तर बँकांना आपल्या कर्जाची रक्कम परत मिळवणे अवघड ठरते.
काही परिस्थितीत तर NBFC आणि इतर संस्थांबद्दल किंवा विशेषतः महिला उद्योजिकांसाठी असलेल्या योजनांची माहिती महिलांना नसते.
3. व्यवहारिक अनुभवाची कमतरता: काही प्रसिद्ध महिला उद्योजिकांना वगळले तर, महिलांना व्यवसायाबद्दल मार्गदर्शन देणारे पर्याय क्वचितच आढळतात.
4. उद्योगाची मानसिकता नसणे: हा मुद्दा विवादित आहे, पण साधारणतः असे समजले जाते की महिलांचे प्राधान्य पगारदार नोकर्यांकडे असते, जिथे कामाच्या वेळा ठरलेल्या असतात, वेतनाची रक्कम निश्चित असते, नियमित वार्षिक रजा मिळू शकते आणि एकंदरच नोकरीत स्थिरता असते.
तरी देखील बलाढ्य अडथळ्यांना मात देऊन, प्रचंड मेहनत व चिकाटी दाखवणार्या महिला उद्योजिकांची चमकती उदाहरणे आहेत ज्या इतर महिलांसाठी आदर्श ठरू शकतात. ह्या महिलांनी पारंपारिक प्रथांना न जुमानता पुरूषांचे वर्चस्व असलेल्या औद्योगिक जगात यश मिळवले आहे. त्यांनी अशा क्षेत्रात प्रवेश करून व्यवसाय स्थापित केले आहेत जिथे पूर्वी कोणी जायची हिम्मत करत नसे.
आपण पाच अशा महिलांबद्दल जाणून घेऊ ज्या हळू हळू यशाच्या पायर्या चढत आहेत.
पारंपरिक प्रथांना धुडकावून लावणार्या 5 महिला उद्योजिका
मनिषा रायसिंघानी, सह-संस्थापक, लॉजिनेक्स्ट सोल्यूशन्स
कारनेगी मेलन यूनिवर्सिटीमधून २००९ साली बिग डाटा व अनॅलिटिक्सचे शिक्षण घेतल्यानंतर मनिषा रायसिंघानी ह्यांनी IBM कन्सल्टिंग कंपनीत लॉजिस्टिक्स क्षेत्रात काम केले. UPS कंपनीत लॉजिस्टिक्स क्षेत्रातील ट्रकमध्ये वापरल्या जाणार्या ओरायन (ऑन रोड इंटेग्रेटेड ऑप्टिमायझेशन अँड नॅविगेशन) सॉफ्टवेअरमध्ये मनिषाची विशेष रुचि होती. त्याच कोर्समधील सहकारी ध्रुविल संघवी व मनिषाने मिळून UPS कंपनीचे तंत्रज्ञान इतर देशात कसे वापरता येईल ह्यावर विचार सुरू केला. २०१४ सालच्या जानेवारी महिन्यात दोघांनी आपली नोकरी सोडून नवीन कंपनीत ७० हजार डॉलर गुंतवले आणि शून्यापासून ६-७ महिन्यात उत्पादन तयार केले आणि अशी लॉंजिनेक्स्ट सोल्यूशन्स कंपनीची सुरुवात झाली.
त्यांच्यासाठी एक मोठे आव्हान हे आहे की बी2बी आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात महिला कमी आढळतात. भविष्यात येणार्या नेतृत्वाच्या भूमिकांमध्ये सर्वांचा सहभाग असावा आणि एकसारखी संधी मिळावी म्हणून मनिषा टीममध्ये एकसारख्या संख्येचे पुरुष व महिला सदस्य राखायचा प्रयत्न करतात. उद्योजिका होण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन दिल्याबद्दल मनिषा आपल्या कुटुंबाच्या आभारी आहेत.
फ्लिपकार्ट व पेटीएम सहित एकूण 60 कंपन्या लॉजिनेक्स्टच्या सेवांचा उपयोग करतात.
अश्विनी असोकन, सह-संस्थापिका, मॅड स्ट्रीट डेन
अश्विनी ह्यांनी आपले पती, आनंद चंद्रसेकरन, ह्यांच्या सह मॅड स्ट्रीट डेन नावाच्या क्लाऊड-बेस्ड प्लॅटफॉर्म ची स्थापना केली. ह्या कंपनीच्या उत्पादनात आर्टिफिश्यल इंटेलिजेंस वापरुन कुठल्याही कॅमेरा असलेल्या स्मार्टफोनने चेहरे ओळखता येतात, चेहर्यावरचे भाव व भावना कळतात आणि केलेल्या हातवार्यांना प्रतिसाद देता येतो. अश्विनी ह्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात इंटेल कंपनीच्या सिलिकॉन व्हॅलीमधील इंटरअॅक्शन अँड एक्सपिरियंस रिसर्च लॅब (IXR) ह्यात मोबाइल इनोव्हेशन टीमची प्रमुख म्हणून केली.
अश्विनी ह्यांचे ठाम मत आहे ही माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राची रचना ही प्रामुख्याने पुरुषांच्या जीवनशैलीसाठी केली गेली आहे. घरगुती काम करणे व मुळा-बाळांना वाढवणे ह्यांचा अशा जीवनशैलीत समावेश होत नसतो. स्तनपान करणार्या मातांसाठी मूलभूत सुविधा आणि धोरणे नसल्यामुळे महिलांना मुले सांभाळणे आणि कामाचा भार ह्यात संतुलन ठेवणे कठीण होते आणि त्यांना कारकीर्दीत प्रगती करता येत नाही. MSD येथे मुले सांभाळण्यासाठी विशिष्ट जागा स्थापित केली आहे आणि महिला व पुरुषांची संख्या समान ठेवली जाते. अश्विनी ह्यांच्या ह्या प्रयत्नामुळे महिलांना नेतृत्वाच्या भूमिकांसाठी स्पर्धा करता येते आणि हे त्यांचे खूप मोठे योगदान आहे.
देबदत्ता उपाध्याय, कार्यकारी अध्यक्ष, टाइमसेवर्झ
शैक्षणिक आयुष्यात उत्कृष्ट गुणवत्ता प्राप्त करणार्या देबदत्ता ह्यांचे इंग्रजी साहित्य व पत्रकारिता ह्यात पदव्युत्तर शिक्षण झाले आहे. टाइमसेवर्झ हा घरगुती कामांचा भारतातील पहिला ऑन-डिमांड बाजार आहे. टाइमसेवर्झ स्थापित करण्यापूर्वी देबदत्ता ह्यांनी टाइम्स ऑफ इंडिया, याहू! मध्ये सेल्स व सेल्स स्ट्रॅटेजी प्रमुख, वीडोपियामध्ये एशिया पॅसिफिक उपाध्यक्ष अशी नेतृत्वाची पदे सांभाळली आहेत. उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना याहू! रत्न पुरस्कार व इंदिरा सुपर अचीवर पुरस्कार देण्यात आले आहेत. महिला उद्योजिकांना प्रोत्साहन देणार्या FICCI फ्लो मुंबई चॅप्टर योजनेत देखील देबदत्ता ह्यांचा सक्रिय सहभाग असतो.
एकाच वेळी गृहिणी, माता आणि व्यावसायिक काम अशा भूमिकांमध्ये संतुलन ठेवणे देबदत्ता ह्यांच्यासाठी मोठे आव्हान ठरले आणि त्यातूनच टाइमसेवर्झची संकल्पना निर्माण झाली. इतर उद्योजिकांचा सल्ला व मदत घेतली तर अडचणींना सामोरे जाता येते असे त्यांचे ठाम मत आहे.
नीतू भाटिया, कार्यकारी अध्यक्ष, क्याझूंगा
पूर्वी इनवेस्टमेंट बँकर असलेल्या नीतू भाटिया पुढे यशस्वी महिला उद्योजिका झाल्या आणि त्यांनी भारताच्या पहिल्या व सर्वात मोठ्या खेळ व मनोरंजन कंपनी ‘क्याझूंगा’ची स्थापना २००७ सालच्या सुरूवातीला केली. क्याझूंगाने २०११ सालचे क्रिकेट विश्व चषक, अनेक अंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा व ऑलिंपिक प्रकारच्या खेळांच्या तिकीट विक्रीचे आयोजन केले आहे. नीतू ह्यांनी वॉल स्ट्रीट वर स्थित कंपन्यांमध्ये वरिष्ठ मीडिया व टेलीकॉम इनवेस्टमेंट बँकरचे काम केले आहे आणि टाइम वॉर्नर, गूगल, कॉमकास्ट, केबलविजन, वेरायझन, सिंग्युलर, एटी&टी व इतर कंपन्यांसाठी धोरणात्मक आणि आर्थिक व्यवहार सल्लागार म्हणून पण काम केले आहे.
नीतू ह्या राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेट खेळाडू असून, सातव्या इयत्तेत असताना त्या महाराष्ट्र राज्याच्या कनिष्ठ संघाच्या कर्णधार देखील होत्या. खेळाबद्दलच्या प्रचंड प्रेमामुळे पुढील आयुष्यात त्यांनी कंपनी स्थापन केली व उत्तुंग यश प्राप्त केले.
अनु श्रीधरन, कार्यकारी अध्यक्ष, नेक्स्टड्रॉप
अनु नेक्स्टड्रॉप कंपनीच्या सह-संस्थापिका आहेत. ही कंपनी पाणी पुरवठ्याबद्दल माहिती गोळा करून नागरिक व सार्वजनिक सेवा व्यवस्थांना ती माहिती पुरवते. नेक्स्टड्रॉप कंपनीची स्थापना २०११ मध्ये झाली. ह्या कंपनीच्या प्रणालीत व्हॉल्व्हमेन रोज सरोवरातील पाण्याची पातळी मोजून पाणी पुरवठा कंपनीला माहिती कळवतात, व ही माहिती पुढे जल अभियंतांना पोहचवली जाते जे रोज पाणी सोडण्याची वेळ, ठिकाण, आणि प्रमाण ठरवतात.
अनु ह्यांनी विकसनशील देशात “ऑप्टिमायझेशन ऑफ पाईप्ड नेटवर्क सिस्टम्स” ह्या विषयावर कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्क्ले इथे संशोधन केले आणि हे संशोधन पूर्ण झाल्यावर त्यांनी भारतात स्थलांतरित व्हायचे ठरवले. अनु ह्यांचे मत आहे की परदेशी असल्यामुळे त्यांना इतर महिला उद्योजिकांना येणार्या आर्थिक व इतर संसाधने मिळविण्यात येणार्या अडथळ्यांना सामोरे जावे लागले नाही.
ह्या ५ महिला तर आपल्या देशातील महिला उद्योजिकांच्या प्रचंड क्षमतेचे एक छोटेसे उदाहरण आहे. आर्थिक व व्यावहारिक ज्ञान आणि संसाधने मिळाल्यास महिला उद्योजिका आपली स्वप्ने पूर्ण करू शकतात व पुरूषांना स्पर्धेत मागे टाकू शकतात.
तुम्ही एखादा व्यवसाय सांभाळणार्या होतकरू महिला उद्योजिका असाल आणि तुम्हाला तुमच्या व्यवसायात वाढ करायची असेल तर आजच ग्रोमोरशी संपर्क साधा!